38) निरनिराळे शेअर घेण्यात जोखीम कमी
Originally published on November 15, 1992
Written by Dr Dileep Javadekar
प्रत्येक शेअर होल्डरकडे शेअरचा एक पोर्टफोलिओ असतो. सुरुवात जरी एका कंपनीच्या शेअर खरेदीपासून झाली, तरी हळूहळू काही वर्षात असा पोर्टफोलिओ उभा केला जातो. या पोर्टफोलिओची मुळात गरजच काय? एखादा गुंतवणूकदार आयुष्यभर फक्त एकाच कंपनीचे शेअर घेऊ शकत नाही काय?
या प्रश्नाचे उत्तर शोधताना अशा प्रकारे एककेंद्रित गुंतवणूक सहज शक्य आहे, हे कुणाच्याही लक्षात येईल. किंबहुना इतर गुंतवणूकही बऱ्याचदा अशीच असते. सगळी बचत बँकेत किंवा पोस्टात ठराविक व्याज दराने ठेवणे, सतत जमेल तसे सोने किंवा चांदी खरेदी करत राहणे, सारखी जमीनजुमल्यात गुंतवणूक करत राहणे किंवा आयुष्यभर हळद किंवा गुळाच्या वायद्यांमध्ये स्वत:ला बुडवून घेणे ही अशा प्रकारच्या एककेंद्रित गुंतवणुकीची उदाहरणेच आहेत. परंतु शेअरमध्ये इतक्या टोकाची एककेंद्रीय गुंतवणूक कुणी करत नाही. याला कारण असे की विविधतेचा (डायव्हर्सीफिकेशन) मोठा फायदा शेअरमधील गुंतवणुकीमध्ये आहे. किंबहुना या फायद्यामुळेच ही गुंतवणूक इतर गुंतवणुकीपेक्षा उजवी ठरते.
डायव्हर्सीफिकेशन म्हणजे काय? तर एकमेकांशी वरवर काहीही, संबंध नसलेल्या अशा पूर्ण भिन्न उद्योगामध्ये आपण एकाच वेळी पैसे लावू शकतो. यामुळे त्या त्या व्यवसायातील तेजी-मंदीचा फायदा अगर तोटा दुसरीकडे भरून निघतो आणि आपल्या गुंतवणुकीमधील जोखीम तेवढी कमी होते.
एखाद्या एस.टी. स्टँडसमोरच्या गाडीवाल्याकडे दोन गाड्या असल्या, तर तो एका गाडीवर गरम चहा आणि भजी विकेल, तर दुसऱ्या गाडीवर थंडगार लिंबू-सरबत विकेल. अशा दुहेरी विक्रीमुळे दुपारी कडक उन्हाच्या वेळी त्याची सरबत विक्री जोरात होईल, तर सकाळ-सांयकाळ किंवा मध्यरात्रीपर्यंत चहाला मागणी जास्त येईल. यामुळे सतत त्याच्या एका तरी गाडीवर गर्दी असेल, अशारीतीने एकीकडची मंदी दुसरीकडे भरून निघू शकेल.
मोठ्या उद्योग-धंद्यातसुद्धा असे तेजी-मंदीचे चक्र असते. सिमेंटला मागणी खूप आहे. सगळीकडे बांधकामे चालू आहेत. अशा वेळी सिमेंटचा पुरवठा कमी पडू लागतो. सर्व सिमेंट कंपन्या भरपूर उत्पादन करतात, तरी त्या मालाला लगेच उठाव येतो. मागणीमुळे सिमेंटचे दरही वाढतात. कंपन्यांचा फायदाही वाढतो. या तेजीच्या वातावरणाचा फायदा उठवण्यासाठी मग सगळ्याच सिमेंट कंपन्या नवीन युनिटस् सुरू करतात. पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन जोरात सुरू करतात. कारखान्याची उत्पादन क्षमता वाढवतात. साहजिकच काही काळाने इतके भरपूर उत्पादन होते, की मागणी पुरी होऊनही सिमेंट कारखान्याकडे पडून राहायला लागते. मग त्या उत्पादित मालाला उठाव नसल्यामुळे स्वस्त विकावा लागतो. हळूहळू उत्पादन वाढविण्यासाठी सुरू केलेली जास्तीची युनिटस् मागणीअभावी बंद करावी लागतात. असे हे चक्र चार-सहा वर्ष चालते. सिमेंटचे उदाहरण दिले असले, तरी असे चक्र सिमेंट, टायर, जहाज उद्योग, औषधे अशा सर्वच उद्योगात असते. प्रत्येक उद्योग एकावेळी या चक्राच्या वेगवेगळ्या ठिकाणावर असतो. तेव्हा आपल्याकडे निरनिराळ्या अनेक उद्योगांचे शेअर असले तर आपणही काही ठिकाणी तेजीमध्ये आणि काही ठिकाणी तोट्यात (किंवा कमी फायद्यात) असतो.
शेअर गुंतवणुकीतला दुसरा मोठा फायदा म्हणजे वारा वाहेल तशी पाठ फिरविणे. या तेजी-मंदीच्या चक्राचा अंदाज घेऊन मंदीच्या कचाट्यातले शेअर विकून टाकता येतात आणि चढणारे धरून ठेवता येतात, त्यांची संख्या वाढवता येते. चांगल्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये हे नेहमीच करावे लागते. मात्र तरीही कधीही सर्व शेअर एक-दोन कंपन्यांचे घेऊन ठेवणे हे कधीही फायद्याचे ठरत नाही.
निरनिराळे शेअर घेतल्यामुळे धोका किंवा जोखीम कमी होते. ती कशी ते आपण पाहिले. परंतु ती किती प्रकारचे शेअर घेतले म्हणजे किती कमी होते? बऱ्याच अभ्यासाने याची एक आडाखा बांधला आहे.
पोर्टफोलिओमधील शेअर किती प्रकारचे? जोखीम किती टक्के कमी होते?
२ ४६
४ ७२
८ ८१
१६ ९३
३२ ९६
६४ ९८
५०० ९९
वरील कोष्टकात एक गृहीत धरले आहे, की, ४, ८ किंवा १६ शेअर हे एकमेकांवर अवलंबून नसलेल्या भिन्न उद्योगधंद्यातीलच असावेत.
यावरून एक दिसून येईल, की वीस किंवा पंचवीस प्रकारचे शेअर्स एखाद्याकडील पोर्टफोलिओमध्ये असतील तर त्याहून अधिक डायव्हर्सीफिकेशनमुळे फारसा फायदा होत नाही. तेव्हा याहीपेक्षा जास्त विविधता पोर्टफोलिओमध्ये आणणे हे फायदेशीर नसून उलट त्यामुळे आपले लक्ष ठेवण्याचे कामच कठीण होते.